अमरप्रेम
निखळ मैत्रीचे खिस्से तर आपण खूप ऐकलेत पण निखळ आणि तंत्रशुद्ध प्रेम म्हणजे अमरप्रेम. यामध्ये कोणताही मोह नाही, कोणताही स्वार्थ नाही, आणि वासनेचा तर कणही नाही. प्रेम म्हंटल कि आपल्या समोर सर्वप्रथम कोणी येत तर रोमिओ आणि ज्युलीएट किंवा लैला आणि मज्नू. अगदी नाहीच नाही तर हिंदी सिनेमातला एखादा नट. पण अमरप्रेम ही कथा अशा किती भारतीयांना माहित आहे? अमरप्रेम शब्द नाही तर कथा. अमरप्रेम ही भारतातील एक सत्य घटना. ज्याचा उलगडा अजूनही झाला नाही कारण ही एका भारतीय खेड्यातील घटना आहे. "अमरप्रेम" या शब्दावर एक मराठी मालिकाही काही दिवस चालली पण त्यात काही वेगळेच होते. काय माहित त्यांनाही या गोष्टीची कल्पना आहे कि नाही ते.
भारतातील उत्तरांचल राज्यातील एका खेड्यातील ही गोष्ट आहे. एका रेल्वे स्थानकावर दोन आगगाड्या थांबल्या होत्या. सगळा गोंधळ होता. कुठे चणेवाला ओरडतोय तर मधेच चहावाला. जो तो आपल्या कामात व्यस्त होता. आणि इथेच सुरवात झाली त्या अमर प्रेमाची. एक अज्ञात तरुण मुलगा व एक सालस मुलगी समोरासमोरून जात होते. काही अंतरावर असताना त्यांची नजरानजर झाली. अगदी चार-पाच घटका अचानक सरून गेल्या, दोघजण बाजूने निघून गेले पण जाताना त्यांचा किंचितसा स्पर्श एकमेकांच्या हाताना झाला. बस्स हेच ते प्रेम. पुढे ते दोघेही आपापल्या दिशेने निघून गेले. जाताना दोघेही एकमेकांना पाहतच राहिले, त्या मुलीच्या बहिणीने तिला आवाज दिला. आणि त्या मुलाला तिचे नाव माहित झाले. दोघांच्याही गाड्या निघाल्या, दोघेही निघून गेले.
जाताना त्या मुलाच्या मनात विचारचक्र सुरु झाले, फक्त तिचा आणि तिचाच विचार. कोण कुठली मुलगी पण ती दिसताच क्षणी काळजाचा ठोका वाजला. मन अजूनही मानत नाही कि ती निघून गेली. तिचा इतका विचार तो करायला लागला कि घरी पोहचेपर्यंत तो तिच्या प्रेमात वेडा झाला. आणि तिच्या नावाने जोर-जोरात ओरडू लागला. आणि वाट दिसेल तिकडे निघाला. तिचा तो विरह त्याला असह्य झाला होता. कोणाशी काही बोलणे नाही. कोणाला काही विचारणे नाही. फक्त तिचे नाव घेत तो चालू लागला. लोक त्याला मारू लागले,शिव्या देऊ लागले, लहान मुले मागून फिरून त्याला चिडवू लागली.
तब्बल साडेचार वर्षांनी तो मुलगा असाच भटकत असताना एका गावात पोहोचला, तिथेही त्याला इतर गावांप्रमाणेच वागणूक मिळाली. लहान मुले त्याला दगड मारत होती आणि तो त्या मुलीचे नाव घेत वाचण्यासाठी पळत होता. त्या गावातील एक मुलगा घरी गेला आणि त्याने "गावात कोणीतरी वेडा आला आहे, आणि तुझ्या नावाने ओरडत आहे" असे सांगितले. त्या वेडयाचे वर्णन ऐकून त्या मुलीला धक्काच बसला. तिने हा तोच मुलगा आहे हे ओळखले आणि ती सुद्धा वेड्यासारखी पळत सुटली. त्या मुलाजवळ पोहचल्यावर त्याने तिच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि अचानक शांत झाला.
त्या मुलीनेही धावत जाऊन त्याला मिठी मारली आणि रडू लागली. सर्व मुलांना बाजूला करून ती जवळच असलेल्या झाडाखाली बसली, मुलगाही तिच्या मांडीवर डोके ठेऊन बसला, आणि दोघे एकमेकांकडे पाहू लागले. 'बस्स माझे प्रेम मला मिळाले' असे म्हणून त्याने तिच्या मांडीवरच प्राण सोडले, आणि त्याच क्षणी विरहात व्याकूळ होऊन त्या मुलीनेही त्याच अवस्थेत प्राण सोडले. संपले प्रेम.
काय पटतंय "संपले प्रेम" ........ नाही ना? म्हणूनच हे "अमरप्रेम". हे प्रेम कधी संपणे शक्यच नाही. भारत सरकारच्या वतीने या प्रेमाचा गौरव म्हणून तेथे त्यांच्या मृत्यू अवस्थेचे एक शिल्प उभारण्यात आले आहे. आणि त्याखाली कोरले आहे "अमरप्रेम".
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा