सोमवार, १ ऑगस्ट, २०११

चारोळी

असं जाता जाता तुझं
मला परत वळून बघणं
तुला जाताना बघून
तुझी वाट बघत जगणं

जाणाऱ्याने जाता जाता
पाठी वळून हसू नये
हसत हसत जाता जाता
जीव घेऊन जाऊ नये

तू गेल्यावर वाट बघत
मी जगायला लागलो
तू वळून बघण्यावरही
कविता करायला लागलो

मला ठाऊक नाही माझं
तुझ्याबरोबर काय काय येतं
इतकंच ठाऊक मला की
तू जाताना सगळंच जातं

येताना समोर बघतेस
जाताना वळून बघतेस
परत यायचं असतं तरी
मला थोडंसं छळून बघतेस

प्रेमात पडल्यावर सगळेच
शहाणे वेड्यासारखं वागतात
खरे वेडे प्रेमात न पडल्यामुळे
स्वत:ला शहाणं म्हणू लागतात

खरच प्राण जाताना
तुझं वळून बघणं आठवेल
दोघात फारसा फरक नाही
हे तेव्हाच खरं जाणवेल

आठवणीत येऊन कोणीही
कोणाला रात्री जागवू नये
प्रेमात वेडेपणा केल्यामुळे
जगाने कोणावरही रागवू नये

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा